श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाप्रसादाच्या सेवेबरोबरच विविध उपक्रम हे प्रबळ नेतृत्वामुळे प्रचंड विस्तार होत असल्याचे समाधान व्यक्त करून, अन्नछत्र हे आम्हा फडणवीस कुटुंबियांचे ‘श्रद्धास्थान’ असल्याचे मनोगत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात सहपरिवार आले असता, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते व विश्वस्त सौ.अर्पिताराजे भोसले यांच्या उपस्थितीत श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. दरम्यान आशिष फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अनघा फडणवीस दांपत्यांच्या हस्ते महाप्रसादाचा संकल्प सोडण्यात आला.
पुढे बोलताना आशिष फडणवीस म्हणाले की, फडणवीस कुटुंबीय आम्ही श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी स्वामी भक्तच, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, हे स्वामींची प्रचितीच आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे गेली ३६ वर्ष सातत्याने महाप्रसाद वाटपाची जवाबदारीने व अत्यंत भक्ती भावाने पार पाडीत आहे. आज अन्नछत्र मंडळाच्या भविष्यातील विस्तारित अतिभव्य प्रसादालायाचे संकल्प चित्र बघायला मिळाले. ते अतिशय उत्तम असून,अक्कलकोटमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काळजी घेऊन उत्तम रेखाचित्र बनविलेला आहे असे फडणवीस म्हणाले.
मंडळाच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या महाप्रसाद गृहाच्या वास्तूची संपूर्ण माहिती आशिष फडणवीस यांना न्यासाचे वास्तुविशारद योगेश अहंकारी यांनी दिली. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाप्रसाद गृहाच्या भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सांगताच, त्यांची तारीख लवकरच मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. याबरोबरच तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराक वाटपाची माहिती आशिष फडणवीस यांना देण्यात आली.