पर्यटन विषयक

अक्कलकोट हे शहर महाराष्ट्रातील सोलापुर जिल्ह्यात येते. हे तालुक्याचे ठिकाण असुन महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वसले आहे. अक्कलकोटला एस.टी. बसने व रेल्वेने येता येते. सोलापुर, नळदुर्ग, गुलबर्गा, गाणगापूर, अफजलपूर ह्या मार्गाने येता येते.

श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा: उद्देश व माहिती

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट हया धर्मादाय संस्थानच्या वतीने दरवर्षी जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका पालखी परिक्रमा आयोजित केली आहे. यंदाचे हे 12 वे वर्ष असुन, गेली 11 वर्षे संपुर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा च्या काही भागात तसेच मध्य प्रदेश व गुजरात सिमेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी गावोगावी व शहरात नेण्यात येते. श्री स्वामी समर्थ महराजांच्या भक्तीचा प्रसार सर्वत्र व्हावा हा प्रमुख उद्देश असुन दुरवर परगावी असणारे स्वामीभक्त, अबाल वृध्द, स्त्रीया, विकलांग रूग्ण इ. ना. इच्छा असुनहि श्री स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे येता येत नाही. अशांकरिता या अन्नछत्राच्या मुळस्थानातील स्वामींच्या पालखीच्या माध्यमातुन श्री स्वामीचं त्यांना भेटल्याचा भाव हया स्वामी भक्तांना पालखी दर्शन झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. त्यांच्या गांवी पालखी गेल्यानंतर हया भक्तांना सहजासहजी स्वामीसेवा करता येते.त्याचप्रमाणे अक्कलकोट हया श्रीक्षेत्राचे ठिकाणी अन्नदान सेवा करणाऱ्या हया अन्नछत्राच्या स्वामी कार्यास तसेच परगांवाहुन येणाऱ्या भाविकांची निवास व्यवस्था व महाप्रसादव्यवस्था असणाऱ्या स्वामी कार्यास हातभार लागावा आणि या माध्यमाद्वारे स्वामी भक्तांना आपली सेवा रूजु करता यावी या उदेशाने सदरची श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा प्रतिवर्षी आयोजित केली जाते. 

या संस्थानच्या पालखी परिक्रमेस परगांवच्या स्वामी भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.दरवर्षी स्वामी भक्तांच्या मागणी प्रमाणे परिक्रमेत नव्याने काहीं गावांचा समावेश केला जातो. यासाठी आणि दरवर्षी नेहमी प्रमाणे पालखी जाते आशांसाठी पालखी निघण्याअगोदर दोन महिने संस्थानचे पालखी परिक्रमा संयोजक व प्रमुख सर्वेक्षण करणे करिता त्या संबंधीत गांवी जाऊन त्यागावातील मुख्य संयोजकाची भेट घेऊन पालखी व सेवेकरी व वारकरी यांच्या व्यवस्थेबद्दल चौकशी व चर्चा करतात. या सर्वेक्षणा नंतर पालखी परिक्रमेचे वेळापत्रक तयार केले जाते. सदरचे वेळापत्रक संस्थानचे सन्मा. संस्थापक अध्यक्ष यांच्या पाहणी व मार्गदर्शना नंतर तयार केले जाते. त्यानंतर पालखी परिक्रमा वेळापत्रक, संयोजकाचे पत्र व परगांवच्या देणगीदारांचे पत्र आणि पालखी परिक्रमेचे भित्ती पत्रके छापली जातात. परिक्रमे अगोदर एक महिना भित्ती पत्रके, वेळापत्रक, व पत्र ही ज्या त्या गावंच्या संयोजकांना पाठविली जातात. त्यामुळे हया संयोजकांना त्यांच्या गांवी पालखी परिक्रमा येण्याच्या तारखेपर्यंत पालखी व्यवस्थेची तयारी करता येते.
अन्नछत्रातुन पालखी परिक्रमेच्या प्रस्थानाची जय्यत तयारी करण्यात येते. या करिता जवळपास १५० वारकरी आजूबाजूच्या गावातुन गोळा करण्यात येतात. हे सर्व वारकरी ४० ते ६० या वयोगटातील असुन त्यांच्या निवासाची, भोजनाची, औषधोपचाराची काळजी घेतली जाते. पालखी सोबत १५० वारकरी आणि संस्थानचे २५ सेवेकरी असतात. तसेच व्यवस्थापनाचा कर्मचारीवर्ग, चालक, सुरक्षा रक्षक वगैरे मिळुन एकंदरीत २०० लोक असतात. पालखी सोबत श्री स्वामी समर्थांची चांदीची मुर्ती व मुखवटा, चांदीच्या पादुका, चांदीचा राजदंड, इ. मौल्यवान वस्तु व मिळालेला निधी असल्याने प्रत्येक गावी व शहरामध्ये पालखीस पोलिस संरक्षण असते. त्रदव्रत वारकरी व सेवेकरी यांच्यासाठी लहान व मोठी अशी ७/८ वाहने असतात. पालखी सोबत हत्ती असतो त्या करिता ट्रकची व्यवस्था केली आहे.
पालखी परिक्रमा ही दररोज दुपारी एका गावामध्ये भक्तांच्या स्वामी सेवेकरीता ५ ते ६ तास थांबते त्यावेळेस संबंधीत संयोजकांनी व ग्रामस्थांकरवी पालखीतील वारकरी व सेवेकरी यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. दुपारी चार नंतर पालखी रात्रीमुक्कामा करिता पुढच्या गांवी जाते. तेथे पालखीतील सर्वांच्या भोजन व निवास व्यवस्था केली जाते. आणि सकाळी स्नान व चहापाण्याची व्यवस्था केली जाते. पालखी मुक्कामाचे ठिकाणी भजन, किर्तन, भारूड, इ. कार्यक्रम केले जातात. सकाळी काकड आरती व हरिपाठ होतो. पालखी परिक्रमेत मिळालेला निधी हा डी.डी.चेकद्वारे अन्नछत्र मंडळाकडे वेळोवेळी पाठवण्याची व्यवस्था केली जाते. अशातऱ्हेने पालखी परिक्रमा कार्यक्रम संपन्न होत असतो.