गुरूपौर्णिमा 2024 – ६ वे पुष्प

सध्याच्या विविध घडामोडीवर वृत्ती, वल्ली व कृती बाबत सडेतोड व परखड विचार राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या कीर्तन कार्यक्रमास भन्नाट श्रोत्यांच्या गर्दीने संपूर्ण परिसर व्यापुन गेलेला होता. भक्ती, शक्ती, धर्म-संस्कार प्रबोधन या त्रिवेणी संगमात लाख भक्तजनांना आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनभुती दिली. प्रचंड गर्दीमुळे न्यासाचा परिसरात ठिकठिकाणी स्क्रीनद्वारे प्रक्षेपण करण्यात आले होते.

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३७ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक उत्सव म्हणजे स्वामी भक्तांना मिळणारी उर्जा आहे. या कार्यक्रमाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांच्या ‘किर्तन’ कार्यक्रमाने ६ वे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज, व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, माजी जि.प.सभापती मल्लिकार्जुन पाटील, धाराशिवचे माजी जि.प.सभापती मुकुंद डोंगरे, माजी प.स.सदस्य धनेश अचलेरे बोरामणी, माजी उपनगराध्यक्ष अशपाक बळोरगी, निवृत्ती महाराजांचे स्वीय सहायक किरण साठे, आबा कापसे हे उपस्थित होते.

दरम्यान राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांचा सत्कार न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. या कीर्तनाला श्री स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्था चीखुर्डा ता.जि.लातूरच्या वारकऱ्यांनी साथ दिली.