श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तर न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त जयंतीच्या मुहूर्तावर सुरु केलेल्या “समर्थ महाप्रसाद” सेवेने गेल्या १०५ दिवसात १४ हजाराचा टप्पा पार केला आहे.
दरम्यान अक्कलकोट शहरातील गरजू, वृद्ध, दिव्यांग, निराधार लोक आहेत, ज्यांची रोजच्या जेवणाची भ्रांत आहे, ही माहिती जेव्हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांना समजली, तेव्हा त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून दोन्ही वेळचे जेवण डब्यातून पुरविण्याचा निर्णय घेतले, त्याप्रमाणे “समर्थ महाप्रसाद” सेवेचा शुभारंभ दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले. आज मितीस १४० जणांना घरपोच डबा देण्यात येत आहे.
गेली ३३ वर्षे अविरतपणे अन्नदानाचे स्वामीकार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे न्यास संपूर्ण देशात ख्यातनाम आहे. संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या कार्यास झळाळी प्राप्त झाली आहे. अन्नछत्र मंडळात दररोज २५ ते ३० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. याबरोबरच “समर्थ महाप्रसाद” सेवा देखील सुरु करून न्यासाच्या कार्यातील एक महत्वाचे पाऊल असल्याचे स्वामी भाक्तातून प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान मानले जात असून, अशा विधायक उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
यापूर्वी कोरोनाचे पार्श्वभूमीवर दोन्ही लॉकडाऊन कालावधीत सामाजिक बांधिलकी जपत ह्या न्यासाने शहर व ग्रामीण भागात अन्नदान सेवा सलग ७ ते ८ महिने केली आहे. कोविड सेंटर मधील कोरोना रुग्णास सलग ५ ते ६ महिने दैनंदिन नाष्टा, चहा व जेवण पुरवठा केले आहे. तसेच शहरात सॅनिटायजर फवारणी करणे मोफत मास्क वाटप इ. उल्लेखनीय कार्य केले आहे. न्यास गरीब व गरजवंताना वैद्यकीय व शैक्षणिक मदत करीत असते. त्याचप्रमाणे जळीतग्रस्त, भूकंपग्रस्त व पूरग्रस्तांना तातडीचा मदतीचा हात देते. १९९३ च्या किल्लारी येथील महाविनाशकारी भूकंपाचे वेळेस महिनाभर दररोज ट्रकभरून अन्न भूकंपग्रस्तांना पाठविण्यात आले.
याबरोबरच २०१४ ला अक्कलकोट ग्रामीण भागातील खानापूर, तडवळ या भागातील पूरग्रस्तांना ८ दिवस मदत पुरविण्यात आली. २०१९ ला सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना व २०२१ च्या पूर परिस्थितीत चिपळूण येथील पूरग्रस्तांना ट्रक भरून जीवनावश्यक साहित्य व अन्नधान्य शिधा पाठविण्यात आला. हे न्यास सामाजिक धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक, आरोग्य, पर्यावरणपुरक, वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन, आपत्कालीन व्यवस्थापन इ. उपक्रम सदैव राबवित असते.