अन्न हे परब्रम्ह ! अन्नदान सर्व श्रेष्ठ दान…
असे म्हटले आहे. त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खुप मोठी आहे. अन्नाची गरज ही या भुतलावरील मानवासहीत सर्व प्राणीमाञांना आहे. अन्नग्रहणाने क्षुधा शमतेलअन्नामधे साक्षात र्इश्वराचा वास असतो, त्यामुळे हया महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तॄप्त होतो. एकप्रकारचे मानसिक समाधान मिळते. हे अचुक हेरून वर सांगितल्या प्रमाणे गुरूपोर्णिमेच्या मुहूर्तावर सन्मा.जन्मेजयराजे भोसले महराजांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना करून स्वामींच्या दर्शनास्तव येणाऱ्या परगांवच्या स्वामी भक्तांना महाप्रसाद व्यवस्था केली. सध्या या अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस १५००० च्या वर परगांवचे स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात.महाप्रसाद गृहात एका वेळेस एक हजार स्वामी भक्त महाप्रसाद घेतील अशी बैठक व्यवस्था केली आहे.
त्यासाठी डायनिंगटेबलची व्यवस्था आहे. गर्दीच्या वेळेस महाप्रसादगृहात ज्या शेड मध्ये महाप्रसाद दिला जातो त्यावेळीस एकावेळेस अडीच हजार स्वामी भक्त महाप्रसाद घेऊ शकतात. महाप्रसादाचा दररोजचा खर्च सरासरी २ लाख ते ३ लाख रूपये इतका आहे. सदरचा महाप्रसाद (मोफत पुर्ण भोजन) मोफत असल्याने येथे कसल्याच प्रकारचे मुल्य त्यासाठी आकरले जात नाही. परगांवच्या स्वामी भक्तांना अन्नछत्र व्हावे ही स्वामी समर्थांची इच्छा आहे. त्यामुळे हे अविरत चालणार ही भावना येथील सेवेकार्यात आहे. त्यामुळे येथे स्वेच्छा दान आहे. स्वामीभक्त हे या स्वामीकार्यात आपले सुध्दा योगदान असावे यासाठी पैशांचा स्वरूपात किवां धान्याच्या स्वरूपात अथवा वस्तुरूपात देणगी देतात आणि हया मिळणाऱ्या देणग्यावरच हे अन्नछत्र चालते. असा दॄढ विश्वास समस्त सेवेक्रयांना आहे.
अन्नछत्र हे दुपारी 12 ते 3 व रात्री 9 ते 11 या वेळेत सुरू असते. गर्दीच्या वेळेस किवां उत्सवाच्या दिवशी हे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते. येथे आलेला भक्त विन्मुख होऊन जात नाही. हे या अन्नछत्राचे विशेष आहे. महाप्रसादासाठी सर्व स्वामी भक्त बंधु भगिंनींना प्रतिक्षा ग्रहातुन रांगेतुन सोडले जाते. त्यामुळे कसल्याही प्रकारचा गोंधळ व गडबड होत नाही.
महाप्रसाद करण्यासाठी 6 आचारी नेमलेले असुन मुख्य आचारी श्री.धानप्पा उमदी हे आहेत. सर्व आचारी मनापासुन सेवा करतात. त्यांना नाममात्र मानधन दिले जाते. गर्दीच्या वेळेस किंवा उत्सवाच्या वेळेस अगदी अल्पावधीतच पाच पन्नास हजार स्वामी भक्तांचा महाप्रसाद तयार होतो. महाप्रसाद तयार करताना कांदा, लसुण याचा वापर अजिबात केला जात नाही. महाप्रसाद अतिशय स्वादिष्ट तयार होतो. अन्नछत्राच्या स्थापनेपासुन आजतागायत महाप्रसादाची अवीट अशी चव आहे. हे या महाप्रसादाचे वैशिष्टय होय.
महाप्रसादासाठी लागणारे गहु, तांदुळ, मटकी, मुग, तुरडाळ, साखर, रवा, गुळ, चना, वटाणा व इ. धान्य व तुप, भुर्इमुग तेल, मसाल्याचे पदार्थ इ. च्या खरेदीवर व नियंत्रणासाठी विश्वस्त, क्रियाशील सदस्य व सेवेकरी वर्ग नेमला असुन धान्यखरेदी अतिशय काळजीपुर्वक व चौकशी करून केली जाते. तसेच सदरचे धान्य, मसाले, तेल दर्जेदार असावे याकडे विशेषत्वानेलक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे अन्नदानाच्या उददेशाने बरेच स्वामी भक्त धान्यरूपात देणगी देतात. त्याचा स्विकार करून त्यांना रितसर धान्यजमापावती दिली जाते. व हे धान्य अन्नदानासाठी वापरले जाते. धान्य ठेवण्यासाठी 40’×20′ आकाराचे मोठे गोडाऊन आहे.
महाप्रसादासाठी लागणारा भाजीपाला खरेदी ही स्थानीक स्तरावर केली जाते त्यासाठी विश्वस्त, क्रियाशील सदस्य व सेवेकरी नेमलेला आहे भाजीपाला खरेदी ही दररोज सकाळी केली जाते महाप्रसादासाठी लागणारी भाजी उदा. बटाटा, भोपळी, कोबी, फ्लावर, पालक, अळू, टोमोटो, काकडी, मेथी, शेपु त्याचप्रमाणे हंगामामध्ये भाजी काळजी पुर्वक व योग्य भावात खरेदी केली जाते.
महाप्रसादाचे व्यवस्थित नियोजनबध्द आणि शिस्तबध्द कार्य चालण्यासाठी ४ व्यवस्थापक नेमण्यात आले आहेत. यांच्या देखरेखी खाली हे कार्य व्यवस्थित चालते. भक्तांची महाप्रसादासाठी पंगत बसल्यानंतर त्यांना ताट ठेवणे, पाणी देणे, ताट लावणे इ. कामे करण्यासाठी १०० च्या वर सेवेकरी वर्ग कार्यरत असतो. यांच्याकरवी महाप्रसाद वाढण्याचे काम नियोजन बध्द होत असते. स्वंयपाक गृहात ५० च्या वर महिला सेवेकरी पोळया लाटण्याचे काम मन लावुन करत असतात. कितीही गर्दी असली तरी त्यांच्या कामामध्ये कसल्याच प्रकारची दिरंगार्इ होत नाही. महाप्रसादासाठी लागणाऱ्या भाजी निवडण्याचे काम १५ महिला सेवेकरी सातत्याने व मनलावुन करत असतात. महाप्रसादासाठी लागणारे धान्य निवडण्यासाठी २० महिला सेवेकरी नेमलेल्या आहेत. हया महिला धान्य निवडण्याचे काम चोख करित असतात. महाप्रसादाची ताटे, वाटया व ग्लास विसळण्याचे काम करण्यासाठी २० महिला सेवेकरी नेमल्या आहेत. सदरच्या महिला त्या त्यांचे ताट विसळण्याचे काम न कंटाळता मनापासुन करत असतात.
अन्नछत्राचे दैनंदिन कामकाज करणेसाठी सेवेकरी वर्ग नेमण्यात आलेले आहे. महाप्रसाद गृहामध्ये अन्नदान व बांधकामाच्या देणग्या स्विकारण्यासाठी लिपीक व रोखपाल नेमण्यात आले आहेत. परगांवच्या स्वामी भक्तांच्या देणग्या स्विकारण्यासाठी त्यांना रितसर पावती देणे. मोठे देणगीदार यांना स्वामींची प्रतिमा/शाल दोन त्यांचा सत्कार करणे. आलेल्या भक्तांची महाप्रसादाची व्यवस्था करणे, अन्नछत्राची पर्यायाने अन्नदान व बांधकाम देणगीबाबतची माहिती देणे इ. कामे लिपीक / रोखपाल करतात. पोष्टाने येणाऱ्या देणग्या स्विकारणे व त्यांचे नांवे महाप्रसाद झाल्यानंतर पत्र व प्रसाद अंगारा पोष्टाने पाठविणे, तसेच कायमठेव देणगीदारांना पत्र व प्रसाद अंगारा पाठविणे इ. कामासाठी लिपीक नेमण्यात आले आहेत.
कायमठेव देणगीदार अन्नदान व बांधकामाचे मोठे देणगीदार यांच्याशी संपर्क ठेवणे. त्यांचे नावे महाप्रसाद करणे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे, अन्नदानाची संबंधीत व्यक्ती/संस्था यांच्याशी पत्रव्यवहार करणे, अन्नछत्राचे वर्धापन दिन/गुरूपोर्णिमा उत्सवाचे पञिका व पत्र पाठवणे. स्वामी जयंती व गुढीपाढव्याचे शुभेच्छा कार्ड पाठवणे. अन्नछत्रास सदिच्छा भेटीस आलेल्या मान्यवंराचा सत्कार करणे, त्यांचे पत्ते व अभिप्राय घेणे, तसेच शासकिय व सेवाभावी संस्थानांशी संपर्क, तद्रंअनुषंगाने समयोचित पत्रव्यवहार इ. करणे कामी लिपीक व कार्यलयीन अधिक्षक नेमण्यात आलेले आहेत. अन्नछत्रातील सर्व प्रकारच्या मिळणाऱ्या देणाग्यांचा दैनंदिन हिशोब ठेवणे, अन्नधान्य, बांधकाम, सेवेकर्यंचे मानधन आणि इतर खर्चांचा व जमा खर्चांचा तपशील ठेवणे. धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालयीन कामकाजासंबंधी पुर्तता करणे आणि संस्थेच्या नेमण्यात आलेल्या ऑडिटर यांचे करवी ऑडिट करून घेणेसाठी लेखापाल व लिपीक नेमले आहेत.
आता अन्नछत्र मंडळाने जुन्या जागेवर नव्याने ४५ कोटी रुपये खर्चाचे नवीन ५ माजली अद्यावत असे महाप्रसाद्गृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सदर महाप्रसाद्गृह कालावधी २ ते ३ वर्षे इतका असणार आहे. तोपर्यंत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जुने महाप्रसाद्गृहा लगत नवीन तात्पुरते महाप्रसाद्गृह शेड उभारले आहे. हे अद्यावत व दरबार हॉल सदृश्य आहे. येथे एका वेळेस १००० भक्त महाप्रसाद घेऊ शकतात. संगमरवर ग्रेनाईट तसेच सिलिंग साठी उच्च दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. तसेच स्वयंपाकगृह, भांडी विसळणेची जागा, भाजीपाला विभाग, चपाती विभाग इत्यादी अद्यावत आहे. प्रत्येक विभागातून सेवेकरी हा विनम्रभावे सेवा करतो.
या नवीन महाप्रसाद गृहाबरोबरच अन्नछत्र मंडळाचे आवारात आमुलाग्र बदल व नानाविध सुधारणा झाल्या आहेत. महाप्रसादगृहा समोर भव्य अशा दिपमाळा आणि कपिला गाय हे सर्व स्वामी भक्तांचे लक्ष वेधून घेते. त्याचप्रमाणे श्री स्वामींचा २५ फुटी मुर्ती आणि वारुळातून प्रकटले हे शिल्प म्हणजे भक्तांचे श्रद्धेचे व आकर्षणाचे केंद्र बनले आहे. अन्नछत्राचे आवारात मुख्य गेटपासून अन्नछत्राचे पिछाडीस असलेले आऊट गेट इथपर्यंत सिमेंटचा व डांबरी करणाचा भव्य रस्ता सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चून करण्यात आला आहे. त्यामुळे माती धूळ व खड्डे चिखल इत्यादी गोष्टी कायमच्या निघून गेल्या आहेत. या रस्त्यावर पांढरे पट्टे व रिफ्लेकटर उठून दिसतात. भाविकाना याचे खूप समाधान वाटते. महाप्रसाद गृहा लगत असलेल्या इमारतीवर श्री स्वामींचे आशीर्वाद देत असलेली मूर्ती भाविकांच्या श्रद्धेचे स्थान बनलेले आहे. त्याचबरोबर महाप्रसाद्ग्रूहा लगत आश्रयदाते कक्ष आणि त्यावरील खास मान्यवरासाठी असलेले महाप्रसाद कक्ष आकर्षक व सुंदर आहे. आणि सन्मानीय अध्यक्ष महाराज यांचे कार्यलय देखील खूपच देखणे झाले आहे. त्याच यात्री निवासासमोरील सुसज्ज वाहनतळ व्यवस्था डांबरीकरण करून तयार केली आहे. त्या वाहनतळालगत उत्तरेस पुर्ण अन्नछत्र परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी गटारीद्वारे शोष खड्ड्यात जाते. सदर शोषखड्डा (जलपुन:र्भरण-रेन हार्वेस्टिंग) ३०x३०x३० आकाराचा विहिरीसारखा खड्डा घेऊन तो भरून त्यात पावसाचे पाणी सोडले आहे. त्यामुळे पर्यावरण समतोल राखून जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
भारतरत्न गानसम्राज्ञी आदरणीय लतादिदी मंगेशकर यांची तरुणाईस प्रेरणादायी व आदर्श असण्यासाठी अन्नछत्रामध्ये शिवस्मारक (गड किल्ले सृष्टी) निर्मिती व्हावी ही संकल्पना त्यांनी मा. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज, संस्थापक अध्यक्ष, यांचेसमोर मांडली. ही संकल्पना मा. महाराजांनी शिरोधार्य मानून शिवस्मारक उभारणी कार्यास सुरवात केली. यासाठी आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन लाभले. छत्रपती शिवरायांची अश्वारूढ पुतळा कोल्हापूरचे श्री. संताजी चौगुले यांनी केले असून तर गड किल्ले सृष्टी उभारण्याचे काम पुण्याचे शिल्पकार श्री विवेक खटावकर यांनी पुर्ण केले आहे. या शिवस्मारकासमोर भव्य असे पाण्याचे कारंजे आणि लॉन गार्डन, त्यामध्ये संगमरवरी बाकडे, त्याभोवती स्टील रेलिंग, फ्लोरिंग पेवर ब्लॉक इ. आणि गड किल्लेचा इतिहासाची कोनशीला इ. सुधारणा अगदी अल्पावधीत करून भव्य व देखण्या अशा शिवस्मारकाची निर्मिती केली. यासाठी करोडो रुपये खर्ची झाले आहे. या शिवस्मारकाकडे जाणेसाठी पाथवे असून त्या दोन्ही बाजूस सुंदर व नक्षीदार असे ८० विद्युत खांब उभारून शिवस्मारक हे एक सर्व स्वामीभक्तांना आणि अक्कलकोट वासियांना आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सदर शिवस्मारकाचे १ मे २०१८ महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
परगावच्या भाविकांच्या सोयीसाठी शिवस्मारकाशेजारी व यात्रीभुवन लगत आऊट डोर जीम (खुली व्यायाम शाळा) ची अप्रतिम व्यवस्था केली आहे. याठिकाणी १३ प्रकारची जिम-व्यायामाची साधने बसविण्यात आली आहे. पुरुषासाठी ९ आणि महिलांसाठी ४ साधने आहेत. हे व्यायाम साहित्य अद्यावत आहेत. त्याचे फ्लोरिंगला लॉन आहे. या सर्व साधनांची माहिती आणि त्याचा वापर याबाबतच्या तपशिलाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ अशा वेळा व्यायामासाठी ठेवल्या आहेत. यामुळे परगावच्या पुरुष व महिला भाविकांची आणि अक्कलकोट शहरवासीयांची चांगली सोय झाली आहे. हे जिम मोफत असून १६ वर्षावरील सर्वांना खुले आहे. याचे १ मे २०१८ रोजी उद्घाटन होवून लोकार्पण करण्यात आले आहे. परगावच्या भाविकांसाठी आणि शहरवासियांसाठी सामाजिक बांधिलकी जपत संस्था. अध्यक्ष मा. जनमेजयराजे भोसले महाराज यांनी १०,००,०००/- लाखाची जिम सामग्री बसविली आहे. आणि ती सध्या कार्यरत आहे.
अन्नछत्राचे पिछाडीस आऊट गेट तयार करण्यात आले आहे. उत्सवाच्या वेळेस, सुट्ट्याच्या कालावधीत व सणावारास वाहनांची प्रचंड गर्दी होते. तेव्हा वाहतुकीचा खोळंबा न होता ती सुरळीत व्हावी ह्या उद्देशाने हे गेट केले असून ते मैंदर्गी-गाणगापूर रस्त्यावर आहे. आतील बाजूस प्रशस्त वाहनतळ व डांबरी रस्ता आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी बुम बॅरीअर सिस्टीम इ. सुधारणा झाल्या आहेत. येथील वाहनतळावर दररोज मोठ्या गाड्या, खाजगी प्रवाशी गाड्या, कार, जीप, एस.टी. गाड्या इ. थांबतात.
या आऊट गेटजवळ वाहनतळापाशी असलेल्या भल्या मोठ्या टेकडीवर खास भाविकांच्या विरुंगुळयासाठी आणि लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी सुंदर, भव्य व रमणीय असे लॉनसह-गार्डन (बाग) आणि त्यावर पाण्याचा धबधबा इ. साठी लाखोरुपये खर्चून सदरचे काम हाती घेण्यात आले आहे. व सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हे टेकडीवरील लॉन-गार्डन मूर्तस्वरुपात येवून भाविकांच्या सेवेत रुजू होत आहे.
न्यासाच्या आउटगेट अलीकडे व यात्रीभुवन इमारतीच्या कोपऱ्यावर प्रशस्त जागेत श्री स्वामी समर्थ जीवन चरित्र दर्शनाचे भित्तीशिल्प उभारण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनचरित्रावरील काही निवडक प्रसंग या भित्तीशिल्पाच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहेत. यासाठी लाखोरुपये खर्च असून केवळ स्वामीभक्तांच्या भावना स्वामीचरणी रुजू व्हाव्यात, त्यांची श्रद्धा वाढीस लागावी आणि श्री स्वामी भक्तीचा प्रसार व्हावा हा एकमात्र उद्देश आहे.
सध्या अन्नछत्रात दिवसेंदिवस सुधारणा व प्रगती होत असून इमारती उभारल्या जात आहेत. भव्य अशा निवासी इमारती व भव्य असे महाप्रसाद गृह आहे. तसेच भाविकांसाठी ए. सी., लिफ्ट, एल ई डी. स्क्रीन, लाईट इ. सारख्या बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वीजेचा वापर वाढला आहे त्याकरिता नैसर्गिक उर्जेचा पुरेपूर वापर करण्यासाठी आऊटगेटच्या वाहनतळावर रुफ सोलार निर्मिती प्रकल्प अल्पावधीतच उभारणार आहे. त्यामुळे विजेची प्रचंड बचत होवून दरमहा होणारा भुर्दंड वाचणार आहे. दररोज येथे १२५ के. व्ही. इतके वीज उतपादन होणार असून सदरचे काम पुण्याच्या सोलोरीच कंपनीस दिले आहे.
दिवसेंदिवस अन्नछत्राची व्याप्ती वाढत आहे. भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी भव्य असे ५ मजली देखणे व मंदिरसदृश्य असे महाप्रसादगृह बांधकाम करण्याचे निश्चित झाले असून सध्याच्या जुन्या महाप्रसादगृह शेडच्या जागेवरच हे बांधकाम होणार आहे. सदर बांधकामास सुमारे दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागणार दरम्यान भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी जुन्या महाप्रसादगृह शेड लागतच नवीन तात्पुरते पत्र्याचे भव्य व देखणे असे महाप्रसादगृह उभारण्यात आले आहे. नियोजित कायमस्वरूपी महाप्रसाद बांधकामाचा अंदाजित खर्च रक्कम रु. ४५ कोटी इतका अपेक्षित आहे. ही नियोजित इमारत संपूर्ण वातानुकूलीत असणार असून त्यात सुलभ शौचालय, लिफ्ट, देणगी कक्ष, महाप्रसाद कक्ष आणि प्रतीक्षा कक्ष असणार आहे. ही देखणी इमारत खुपच भव्य असणार आहे. त्यामुळे भाविकांची चांगलीच सोय होणार आहे. यातील महाप्रसादगृहाची क्षमता एकावेळेस सुमारे २००० भक्तांची असणार आहे असे ३ मजले महाप्रसाद कक्ष असून एक मजला प्रतीक्षा कक्ष व एक मजला स्वयंपाक गृह चपाती व भाजी विभाग इ. असणार आहे. सध्या इमारतीचे बांधकाम लवकर सुरु होणार असून पूर्वतयारी करण्यात आली आहे. बांधकाम लवकर पुर्ण करून स्वामी भक्तांच्या सेवेत मोठ्या दिमाखात रुजू होत आहे.
परगांवच्या भाविकांची वाढती गर्दी आणि संस्थानचा वाढता व्याप यामुळे अन्नछत्राच्या आणि परगांवच्या भक्तांचा सुरक्षिततेसाठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असुन सुरक्षा रक्षक अत्यंत प्रामाणिकपणे व इमान इतबारे ही सेवा अहोरात्र बजावत असतात. मुख्य गेटजवळ मुख्य सुरक्षा चौकी व कार्यालय असुन एकंदर ३२ सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत व एक मुख्य सुरक्षा अधिकारी नेमण्यात आला आहे. मुख्य गेटवर, महाप्रसादगृह, प्रवेशव्दार, महाप्रसादगृहातील देवघर आणि दानपेटया या ठिकाणी अन्नछत्र परिसरातील श्री शमिविघ्नेश गणेश मंदीर येथे आणि वाहनतळ या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले असुन यांचे काम पाळयामध्ये चालते.दररोज स्वामी भक्तांना रांगेमध्ये महाप्रसादासाठी सोडणे, गेटमध्ये आत आलेल्या एसटी व इतर वाहनांची नोंद घेणे, अन्नछत्रास आलेले भक्त व वाहने यांची काळजी घेणे व गर्दीवर नियंत्रण आणि लक्ष ठेवणे इ. कामे सुरक्षा रक्षकांकरवी करून घेतली जातात.
अन्नछत्रातील दैनंदिन कार्यक्रम अन्नछत्रात दररोज सकाळी श्री शमीविघ्नेश गणेशाची, महाप्रसादगॄहात व अन्नपुर्णेची, जुन्या अन्नछत्रात औदुंबरची जिथे स्वामी बसुन माधुकरी घेत असत, तसेच स्वामी मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वारालगतच्या अन्नछत्राच्या जागेतील कार्यालयातील पुजा संस्थेचे पुजारी करतात. अन्नछत्रातील दैनंदिन नित्य मुख्य कार्यक्रम हा सकाळी ११.०० वाजता सुरू होतो. रू.५०१/- देणगीदार व कायमठेव देणगीदार तसेच मान्यवर अतिथी यांचे हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांना महानैवैद्य दाखवुन झाल्यावर महाप्रसादगृहात महाआरती होते. त्यानंतर अतिथी / देणगीदारांच्या शुभहस्ते अन्नदानाचा संकल्प सोडला जातो. संकल्प सोडल्यानंतर महाप्रसादासाठी आलेल्या स्वामीभक्तांची महाप्रसाद घेण्यासाठी पंगत बसते. पंगत पुर्ण वाढुन होर्इपर्यंत श्री स्वामी नामांचे नामस्मरण व गजर केला जातो. मग महाप्रसाद घेण्यास सुरूवात होते. या प्रमाणे भक्तांच्या पंगतीवर पंगती उठत असतात. हा महाप्रसाद दुपारी तीन वाजेपर्यंत दिला जातो. त्या नंतर महाप्रसाद देण्याचे बंद होते. दरम्यान मान्यवर अतिथी किंवा देणगीदार यांचा स्वामींची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला जातो. मान्यवरांचे महाप्रसादाबाबत व अन्नछत्राच्या एकंदरीत व्यवस्थेबद्दल त्यांचे अभिप्राय, त्यांचे पत्ते व फोन नंबर इ. घेतले जातात. रात्री ९ वाजता पुन्हा महाप्रसादाची सुरूवात होते. हा महाप्रसाद रात्री ११ वाजे पर्यंत दिला जातो. या सर्व कामाकरीता आचारी, महिला सेवेकरी आणि वाढपी सेवेकरी सेवा करीत असतात. महाप्रसादानंतर असंख्य स्वामी भक्त स्वेच्छा देणगी देत असतात. त्यांना रितसर देणगी पावती दिली जाते. यासाठी कॅशिअर व लिपीक कार्यरत आहेत. येथे दररोज सरासरी १५००० हजार च्यावर परगांवचे स्वामीभक्त महाप्रसादाचा लाभ घेतात.
ही अन्नदानाची योजना सर्व स्वामी भक्तांना आवडेल अशीच आहे. सदरच्या योजनेअतंर्गत स्वामीभक्तांनी रू.११,००१/- देणगी कायमठेव म्हणुन देऊ केली तर त्यांनी सांगितलेल्या तारखेस किंवा तिथीस त्यांचे नावे प्रतिवर्षी अन्नदान केले जाते. सदर भक्तांच्या नावे महानैवैद्य करून महाप्रसाद (अन्नदान) केला जातो. दरवर्षी भक्तांच्या होणाऱ्या अन्नदानाच्या तारखेस / तिथीस हे स्वामीभक्त उपस्थित राहु शकतात. उपस्थित राहु न शकल्यास प्रसाद व अंगारा घरपोच पोष्टाने पाठविला जातो. त्यांच्या हस्ते महानैवैद्य होऊन संकल्प होऊन महाप्रसाद स्वामीभक्तांना दिला जातो. या व्यतिरिक्त खालील प्रमाणे अन्नदानाच्या कांही योजना आहेत. तसेच रु.५०००/- देणगी कायम ठेव देऊ केल्यास त्यांनी सांगितलेल्या तारखेला किंवा तिथीस प्रतिवर्षी अन्नदान संकल्प करता येतो.
अन्नछत्राची व्याप्ती वाढत चालली तसे परगांवच्या स्वामी भक्तांच्या देणग्यांच्या ओघ हि वाढत चालला आहे. सदरच्या देणग्या देणाऱ्या देणगीदारांना त्यांनी दिलेल्या देणगीस आयकरातुन सवलत मिळावी यासाठी आयकर अधिनियम १९६१ च्या कलम ८०जी अन्वये सवलत देण्यात आली आहे. सदरच्या तरतुदीमुळे देणगीदारांना याचा फायदा होतो. तसेच संस्थानला मिळणाऱ्या देणग्यामध्ये वाढ होते. या ८० जी कलमाच्या सवलतीचे प्रमाणपत्र आयकर आयुक्त, पुणे. यांच्या कडुन मिळाले आहे.
श्री स्वामी समर्थाच्या पावनभुमीत अन्नदानाचे चाललेले पवित्र असे स्वामीकार्या बरोबर स्वामी समर्थांच्या असीम कॄपेने अन्नछत्र मंडळात श्री दत्त जयंती, गुरूप्रतिपदा(गाणगापुर यात्रा), श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव आणि गुरूपोर्णिमा (अन्नछत्र वर्धापन दिन) इ.उत्सव भव्य प्रमाणात साजरे होत असतात. श्री दत्त जयंती, गुरूप्रतिपदा, श्री स्वामी समर्थ जयंती व पुण्यतिथी या उत्सवावेळेस परगांवचे लाखो स्वामीभक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी येतात आणि महाप्रसाद घेऊन तृप्त होतात. या दिवशी खास करून महाप्रसादासाठी अन्नछत्रात पंचपक्वान्न केले जाते. पोळी, दोन भाज्या, आमटी, खीर, शिरा ,बुंदीलाडु, साखर भात, पुरणपोळी इ. चा खास करून पंचपक्वान्नाचा बेत असतो. या उत्सवाकरिता परगांवचे लाखोभाविक येतात व या महाप्रसादाचा लाभ घेतात. उत्सवाचे दिवशी अन्नछत्र परिसर फुलांनी व भगव्या पताकांनी सजविले जाते.
२९ जुलै १९८८ गुरूपौर्णिमा या दिवशी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना झाली. त्यामुळे श्री गुरूपौर्णिमा आणि वर्धापन दिन हा उत्सव या संस्थानमध्ये विशेषत्वाने आणि भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जातो. या वर्षी १८ जुलै २००८ रोजी गुरूपोर्णिमा व अन्नछत्राचा २१ वा वर्धापन दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला. दरवर्षी गुरूपोर्णिमा / वर्धापन दिनाच्या उत्सवाचे दिवशी मान्यवर अतिथींना निमंत्रण दिले जाते व त्यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थांना पंचपक्वान्नाचा महानैवैद्य दाखविला जातो. महानैवैद्य नंतर महाप्रसादगृहात महाआरती होऊन संकल्प सोडला जातो. यानंतर स्वामीभक्तांना महाप्रसाद दिला जातो. दरम्यान प्रमुख मान्यवर व अतिथींचा व देणगीदारांचा श्री स्वामींची प्रतिमा ,शाल ,श्रीफळ देऊन सत्कार केला जातो.
या दिवशी अक्कलकोट शहर व तालुक्यातील एस.एस.सी. व एच.एस.सी परिक्षेत सर्वप्रथम आलेल्या तसेच उच्चशिक्षणात प्राविण्य मिळवलेले व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा व गुणीजन आणि गुरूवर्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा, श्री स्वामींची प्रतिमा, शाल, श्रीफळ व गौरवप्रमाणपत्र देऊन सत्कार केला जातो. दिवसभर, रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद देण्याचे स्वामी कार्य चालु असते. यादिवशी अंदाजे लाख ते सव्वालाखापर्यंत स्वामीभक्त महाप्रसादाचा लाभ घेऊन तृप्तीची ढेकर देतात. या दिवशी दिवसरात्र अन्नछत्र चालु असते. यादिवशी बरेच मान्यवर, सन्मा. अतिथी, शासकीय व निमशासकीय अधिकारी आवर्जुन महाप्रसादासाठी अन्नछत्रास भेट देतात व चाललेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करतात. सायंकाळी ठीक सहा वाजता अन्नछत्रातुन श्री स्वामी समर्थांची सजवलेली पालखी व कलापुर्ण असा फुलांनी सजवलेला रथ यांची शहरातुन भव्य अशी मिरवणुक हत्ती, घोडे, मर्दानी खेळ , आदिवासी नृत्य, परगांवाहुन आलेले व स्थानिक बँड, लेझीम पथक, ढोलीबाजा, हलगी, तुतारी, सनर्इ चौघडा , पुरूष दिंडया, महिला दिंडया व भजनी मंडळांचा समावेश असतो. मिरवणुकी समोर शोभेच्या दारूकामाची आताषबाजी असते. एकंदरीत अन्नछत्राच्या स्वामींच्या पालखी/रथ सोहळयाची मिरवणुक डोळयाचे पारणे फेडणारी असते. या गुरूपोर्णिमा व वर्धापन दिन उत्सव कार्यक्रमात गुरूपोर्णिमे अगोदर १० दिवस धर्म संकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम संस्थानमार्फत आयोजित केला जातो. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रवचनकार, किर्तनकार भक्तीसंगीताच्या माध्यमातुन गायक/गायिका व भजनीमंडळे आपली सेवा रूजु करून स्वामी चरणी हजेरी लावुन स्वत:ला धन्य समजतात. या संस्थानचा धर्म संकिर्तन कार्यक्रम व गुरूपोर्णिमा / वर्धापन दिन उत्सव सबंध महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या कार्यक्रमात व उत्सवात भाग घेण्यासाठी हजारो परगांवचे स्वामीभक्त येतात.