
विश्वात्मक सूर
विश्वाच्या पाठीवर सदा सर्वकाळ कुठे ना कुठेतरी लतादीदींचा स्वर्गीय सर उमटत राहतो , निनादत राहतो… आणि त्यामुळेच लतादीदी अमर आहेत. त्यांचा दैवीय स्वर हा त्यांच्या अस्तित्वाची सदैव साक्ष देत राहील. देव , देश आणि धर्मासाठी त्या जगल्या आणि सातत्याने तीस वर्षे याची अनुभूती एक स्वामी भक्त म्हणून मी घेऊ शकलो.
‘ देव ‘ म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये मंगेशी देवी नंतर स्वामींचे अनन्यसाधारण महत्त्व होते .
‘ देशा’ साठी – स्वदेशासाठी प्राण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांची असीम निष्ठा होती
आणि
‘ राष्ट्र ‘ धर्म ज्यांनी जागवला त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत देखील त्यांच्या भाव विश्वात एक अनन्यसाधारण महत्त्व होते.
श्री स्वामी आणि अक्कलकोट हे त्यांच्या विशेष श्रद्धेचे विषय होते. त्याच माध्यमातून त्यांच्याशी सूर जुळले . केवळ परंपरा म्हणून नव्हे तर एक स्वामी सेवक म्हणून अक्कलकोट मध्ये येणाऱ्या प्रत्येक भुकेलेल्या व्यक्तीला अन्न आणि भाविकाला छत्र देण्याची अन्नछत्र मंडळाची संकल्पना त्यांना खूप भावली आणि त्यातून त्यांनी स्वामी चरणी आपल्या वैभवातील काही मोती दान केले.
गेली तीस वर्षे या स्नेहमयी माऊलीच्या सहवासामध्ये वावरण्याचा आणि त्याची अनुभूती घेण्याचे सुवर्णमयी पर्व मी अनुभव शकलो .
छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आणि माझे सामायिक अधिष्ठान ! त्यामुळे हे सूर अधिकच घट्ट झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रखर देशभक्ती त्यांच्यामध्ये उतरली होती . स्वामीनिष्ठा , राष्ट्रनिष्ठा , सूरनिष्ठा या त्रायींचा संगम दीदींच्या ठाई होता . अक्कलकोट मध्ये सुरू असलेले कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प आणि त्यातून स्वामी भक्तांना मिळणाऱ्या सुविधा हा नेहमीच त्यांच्या करिता अत्यंत संवेदनेचा विषय राहिला. त्यासाठी त्यांनी भरपूर सहकार्य देखील केले आणि आमच्या विचारांना नवी दिशा दिली.
आजही मंगेशकर कुटुंबियांनी मला अंतर दिले नाही.. आजही उषा दीदी , मीना दीदी ,पंडित जी आणि सर्वच मंगेशकर कौटुंबीय यांच्या अतिव सद्भावनेतून , प्रेमातून त्यांनी अक्कलकोटशी आणि स्वामी भक्तांची असलेला संवाद कायम ठेवला आणि याच माध्यमातून लतादीदींच्या इच्छेचा , भावनेचा , स्वप्नांचा अखंड जागृत यज्ञ सुरू राहिला आहे अशी माझी भावना आहे.
महाराष्ट्राला त्या गाणं कोकिळा म्हणून परिचित असतील परंतु स्वामी भक्तांसाठी त्या एक दानशूर कर्तृत्व म्हणून परिचित आहेत. सरस्वतीच्या दरबारातील हे माणिक अखंड हिंदुस्तान च्या शिरावर शोभून दिसत होते मात्र ते विश्व तेजाचे ही समर्पक द्योतक होते. भारत आणि सीमा रेषेवरील राष्ट्र सीमा आपल्या प्रेमामयी स्वरांनी एकत्रित करून विश्वाला गवसणी घातली आणि वसुधैव कुटुम्बकम चा संस्कार जगासमोर ठेवला. आजही प्रत्येक कंठस्थ आराधनेमध्ये लतादीदी जिवंत आहेत .
आज या निमित्ताने लता वैद्यक पुरस्कार देण्याची एक अत्यंत चांगली संकल्पना साकारली जात आहे.. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार मोठे समर्पण दिले . एमआयटीच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीत सप्तसुरांचे विश्वविद्यालय उभा राहिले तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेचा एक महायज्ञ सुरू झाला .
दक्षिणेमध्ये जन्मलेले परंतु जगभरात आपल्या वैद्यक विज्ञान विद्वत्तेने विख्यात झालेले एस. राजशेखरन यांना हा पुरस्कार दिला जात आहे आणि याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटीचे विश्वनाथ कराड हे आहेत हा एक अपूर्व योगायोग आहे.
दीदींनी जी दोन उदात्त स्वप्ने पहिली त्यांना साकारणारे हे दोन महान दूत खऱ्या अर्थाने त्या देवीचे स्वप्न पूर्ण करीत आहेत.
अशा या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याचा मिळालेला सन्मान हा देखील मी मोलाचा समजतो. हा माझा व्यक्तिशः सन्मान नाही तर सगळ्या स्वामी भक्तांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपाचा बहुमान मी मानतो.
दीदीचा स्वर अमर आहेच तथापि त्यांच्या स्वप्नांच्या परिघावर असलेल्या या संस्था आणि संस्थांच्या माध्यमातून दिले जाणारे पुरस्कार आणि त्यातून समाजाला मिळणारी प्रेरणा ही अशीच अखंडित प्रवाहित राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना !

