श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात पार्थिव गणपतीची गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात पार्थिव गणपतीची सालाबादप्रमाणे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले व त्यांच्या पत्नी अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा, अभिषेक करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध धार्मिक विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्याकडून करण्यात आली.

श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे सन १९८८ च्या श्री गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या नंतरच्या काळात न्यासाच्या आवारात सन १९९० साली जमिनीची झाडी, झुडपे काढून साफ-सफाई व सपाटीकरण करीत असताना जमिनीच्या मध्यवर्ती भागात शमीवृक्ष आढळला. तेथे सपाटीकरण करते वेळेस श्री गणेशाची सुंदर मूर्ती आढळली. त्याच शमीवृक्षाखाली ३४ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर बांधण्यात आले आहे.


या मंदिरात नित्य पूजा अर्चा, अभिषेक, अथर्वशीर्ष अभिषेक (२१ व १०० आवर्तने), सहस्त्र दुर्वार्चन, गणेश याग अशी सेवा करण्यात येते. संकष्टी व अंगारकी चतुर्थीला श्रीक्षेत्र अक्कलकोटातील गणेश भक्तांकडून आरती करण्यात येते.