आई राजा उदो..! सदा नंदीचा उदो..!! जय भवानी.. जय शिवाजीच्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात न्यासाच्या वतीने श्री तुळजाभवानी माता मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, कळसारोहन आणि मंदिर लोकार्पण सोहळा संभळाच्या गजरात विधिवत पूजनाने मिती श्रावण शु ||१५, नारळी पौर्णीमा शके १९४६, सोमवार रोजी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली थाटात संपन्न झाला.
दरम्यान होम, हवन, विधिवत पूजन सोलापूरचे वे.शा.स. कणसावी गुरुजीसह तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पिरोहित वे.शा.स. शाहू मगर, नागेश अंबुलगे, जयराम रणदिवे, श्रीराम अंबुलगे, मणुर येथील ब्रह्मवृंदानी व न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी यांच्या यथसांग विधिवत पौरोहित्य मंत्र पठणाने व वाद्यांच्या गजरात न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व विश्वस्त अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी मातेचीमूर्तीची स्थापना करून, नैवेद्य व आरती करण्यात आली. याप्रसंगी जन्मेजयराजे भोसले यांनी सहपत्निक श्री तुळजाभवानी मातेची दर्शन घेतले.
दरम्यान विरक्त मठाचे श्री.म.नी.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात कळसारोहन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी गोंधळ, आरती, अन्नदान असे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. श्री तुळजाभवानी मंदिराचे बांधकाम करणारे तेलंगणाचे राघवेंद्र व त्यांची टीमसह अन्य सहकार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री तुळजाभवानी मंदिर मुहूर्त स्वरुपात साकारले :
अन्नछत्र परिसरात श्री तुळजाभवानी मातेची मंदिर उभारण्यात यावे असे येथे येणाऱ्या हजारो स्वामी भक्तांनी इच्छा व्यक्त केली. यास न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी मुहूर्त स्वरुपात साकारले आहे.